जे मला योग्य वाटते तेच मी केले…

राफेल विमानाच्या पुजेवरील वादावर राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : फ्रान्सचा तीन दिवसीय दौरा संपल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रात्री उशिरा मायदेशी परतले आहेत. राफेल लढाऊ विमानाच्या पूजेवरुन निर्माण झालेल्या वादावर राजनाथ सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकांना जे वाटते ते बोलू शकतात. जे मला योग्य वाटते तेच मी केले. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी माझी श्रध्दा आहे. माझासुध्दा लहानपणापासून या गोष्टीवर विश्वास आहे.’ असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी राफेलच्या विधीवत पुजेवरून सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली होती.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी राफेलमधून केलेल्या प्रवासाचा अनुभव देखील सांगितला. राफेल विमान प्रति तास 1800 किमी वेगाने उड्डाण करु शकते. मी या विमानातून 1300 किमी प्रति तास वेगाने प्रवास केला. राफेलचा करार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्‍य झाला. राफेलमुळे वायुदलाची क्षमता वाढली आहे. राफेल विमान कोणाला घाबरवण्यासाठी नाही तर वायुदलाची ताकद वाढवण्यासाठी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राफेल विमान आणण्यासाठी फ्रान्सला गेले होते. दसऱ्याच्या दिवशी फ्रान्सने पहिले राफेल विमान भारताच्या ताब्यात दिले. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पुजा केली. त्यांनी भारतीय परंपरेनुसार विमानावर ओम चिन्ह काढून नारळ वाहिला. तसेच विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले होते. या पुजेवरुन राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पुजेचा काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरुन राजनाथ सिंह ट्रोल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.