“मी राष्ट्रपती नियुक्त खासदार,हे पद मागायला भाजपकडे गेलो नव्हतो”; संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना सडेतोड उत्तर

कोल्हापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता  खासदार संभाजीराजे आणि भाजप यांच्यातच शाब्दिक वाद होताना दिसत आहे. ‘संभाजीराजे मान्य करत नसले, तरी ऑन पेपर ते भाजपाचेच खासदार आहेत’, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर विधान केले होते. त्यांच्या विधानाला संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो, त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिलं आहे,’ अशा शब्दात संभाजीराजे यांनी फटकारले आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला ६ जूनपर्यंतचा अवधी दिल्यानंतर सरकारने कोणताही कृती कार्यक्रम जाहीर न केल्याने छत्रपती संभाजीराजे आज  मूक आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर काल आंदोलनस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी खासदारकीहून लगावलेल्या टोल्याला प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला. “कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे, पण खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सन्मानपूर्वक हे पद दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकच करतो,” असे म्हणत संभाजीराजे यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.

‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. आदरपूर्वक हे पद मला दिलं आहे. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस असो वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार… या सर्वांशी माझे चांगलं जमतं. राज ठाकरे हेदेखील मला जवळचे आहेत. आता तर प्रकाश आंबेडकर हेसुद्धा जवळचे झाले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात आपले चांगले संबंध आहेत’, असं विधानही संभाजीराजे यांनी केलं. ‘मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेला लढा हा केवळ मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नाही’, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

“संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भाजपा खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपाचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कुणी चालढकल करत असेल, तर ते मान्य होणार नाही. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?,” असं चंद्रकांत पाटील इस्लामपूर येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.