टोकियो – ‘मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होते, की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता.’, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भालाफेकपटून निरज चोप्रा यांनी दिली.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी झाला. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने ही अपेक्षा पूर्ण करत भारताला ऑलिम्पिक इतिहासात ऍथलेटीक्स प्रकारात पहिलेवहिले “सुवर्ण’ पदक मिळवून दिले. त्याने या ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले व इतिहासातील दुसरे सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
पात्रता फेरीत 86.65 मिस्टर भालाफेक करून नीरजने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होत. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये 87.03 मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत 87.58 मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो 76.79 मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये 84.02 मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी 87.58 मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
नीरजने सुवर्णपदक पटकावल्यानंतर रौप्य पदकावर चेक रिपब्लिकच्या जाकुबने 86.67 मीटर भाला फेकून आपला हक्क सांगितला. कांस्य पदक त्याचाच संघ सहकारी वेस्ली याने 85.44 मीटर भाला फेकून आपल्या नावे केले.
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.