पिंपरी – युक्रेन आणि रशियामध्ये जोरदार युध्द सुरू झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. दोन देशांमधील वाद चिघळल्यानंतर युद्ध सुरू होण्यापूर्वीच एक दिवस अगोदर ती पिंपरी-चिंचवडमधील कोमल पवार शहरात परत आलीय. मात्र, तिला आपल्या मित्र-मैत्रिणींची काळजी वाटत असून ते सुखरूप भारतात यावेत, अशी अपेक्षा तिने दै. प्रभातशी बोलताना ती म्हणाली.
माजी नगरसेवक काळूराम पवार यांची कन्या कोमल पवार ही शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होती. ती एमबीबीएसच्या द्वितीय वर्षांत आहे. कोमलचे दोन वर्षांपासून तिथंच शिक्षण सुरू आहे. अनेक विद्यार्थी नवीन आहेत त्यांचे पासपोर्ट देखील इमिग्रेशन ऑफिसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आले नाही.
आम्ही रहायला होस्टेलमध्ये आहोत, तिथे असे बरेच परदेशी विद्यार्थी अडकून पडले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत असे कोमल म्हणाली. युक्रेनच्या तुलनेत रशिया खूप ताकदवान देश आहे. युद्ध विराम होऊन सगळे पूर्ववत व्हावे अशी इच्छा आहे. पण, सध्यातरी ते कठीण दिसत असून सर्व पूर्ववत झाल्यास शिक्षणासाठी पुन्हा युक्रेनला परतेन, असेही कोमलने सांगितले.
कोमलचे वडील माजी नगरसेवक काळूराम पवार म्हणाले, माझ्या मुलीसारखे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असून भारत सरकारने युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत घेऊन यावे.
पासपोर्ट देण्यास नकार
महाविद्यालय आणि तेथील सरकारच्या वतीने आम्हाला घाबरून जाऊ नका अशी सूचना केली. परिस्थिती अधिकच बिकट होत गेल्याने महाविद्यालयाकडे पासपोर्ट मागितला. मात्र, महाविद्यलायने पासपोर्ट देण्यास नकार दिला. त्यानंतर मी भारतीय दुतावासाशी संपर्क साधल्यानंतर मला महाविद्यालयाने पासपोर्ट दिला आणि मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (दि.24) रशियाने युद्धाला सुरुवात केली आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारी (दि.23) सकाळी सात वाजता मी आपल्या शहरात परत आले, असे कोमल पवार म्हणाली.