नवी दिल्ली – पंजाब प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन खळबळ माजवणारे असंतुष्ट नेते नवज्योतसिंग सिद्धु यांनी आपल्याला पद मिळो वा ना मिळो पण आपण राहुल व प्रियांका गांधी यांच्याबरोबरच राहणार आहोत असे स्पष्ट केले आहे.
सिद्धु यांच्या पक्षातील भूमिकेबद्दलही शंका व्यक्त केल्या जात होत्या तथापि त्यांनी आपण कॉंग्रेस सोडणार नाही असे या आधीच स्पष्ट केले आहे. ते निवडणुकीपर्यंत तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत असेही जवळपास स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज सिद्धु यांनी जे ट्विट प्रसारीत केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या तत्वानुसारच आपण कार्यरत राहणार असून मला पक्षात कोणते पद मिळाले किंवा नाही मिळाले तरी मी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची साथ सोडणार नाही.
सर्व नकारात्मक शक्तींनी एकत्र येऊन मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्याकडील पॉझिटीव्ह उर्जेद्वारे पंजाब जिंकेन,पंजाबी आणि पंजाबियत या साऱ्यांचाच एकत्रित विजय झालेला पहायला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या ट्विटर संदेशामुळे पंजाब प्रदेश कॉंग्रेस मधील वादळ हे पेल्यातील वादळच ठरले आहे.