मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केल्याची टीका राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधताना केली. हे सांगताना मुश्रीफ यांनी आपण स्वतः शरद पवारांच्या परवानगीने अजित पवारांसोबत आल्याचाही दावा केला.
फडणवीसांचे विश्वासू समरजितसिंह घाटगे यांनी गत आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर निशाणा साधला.
मुश्रीफ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला. एखादा माणूस एखाद्याचा गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो. कागलच्या जनतेने मला 6 वेळा निवडून दिले म्हणून आता हवा बदलली असे काहींना वाटत असेल. पण यंदाच्या निवडणुकीत अशीच हवा बघत राहिलात तर तुमचे वाटोळेच होईल.