लढती झाल्या आता प्रतीक्षा निकालाची

सर्वच विधानसभा मतदारसंघात भरघोस मतदान

सातारा –
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे स्वाभाविकच खा.उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीचा सामना होणार हे निश्‍चित झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सरासरी 60.33 मतदान झाले. विशेष बाब म्हणजे, सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांच्या जवळपास राहिल्यामुळे निकाल काय लागणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. त्या मतदारसंघात 63.11 टक्के मतदारांनी म्हणजेच 1 लाख 82 हजार 372 मतदान झाले आहे. त्यामध्ये 96 हजार 655 पुरूष तर 85 हजार 717 महिला मतदारांचा समावेश आहे. कराड दक्षिणपाठोपाठ कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. मतदारसंघात 63.04 टक्के म्हणजेच 1 लाख 83 हजार 280 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 96 हजार 574 पुरूष तर 86 हजार 706 महिला मतदारांचा समावेश आहे. कराड उत्तर पाठोपाठ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 60.65 टक्के मतदान झाले आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 80 हजार 3 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामध्ये 83 हजार 495 महिला मतदार तर 96 हजार 508 पुरूष मतदारांचा समावेश आहे. कोरेगाव पाठोपाठ वाई विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. वाई मतदारसंघात 60.36 टक्के म्हणजेच 1 लाख 99 हजार 252 मतदान झाले आहे. त्यामध्ये 1 लाख 5 हजार 794 पुरूष तर 93 हजार 457 महिला मतदारांचा समावेश आहे. वाई पाठोपाठ सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात 59.22 टक्के म्हणजेच 1 लाख 98 हजार 155 इतके मतदान झाले आहे. त्यामध्ये 1 लाख 2 हजार 146 पुरूष तर 96 हजार 8 महिला मतदारांचा समावेश आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 55.87 टक्के इतके मतदान झाले आहे. त्या मतदारसंघात एकूण मतदान 1 लाख 66 हजार 372 इतके मतदान झाले आहे. विशेष बाब म्हणजे पाटण मतदारसंघात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केले आहे. त्या मतदारसंघात 84 हजार 894 महिला मतदारांनी तर 81 हजार 478 पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, मागील दोन म्हणजेच सन.2009 आणि सन.2014 च्या निवडणूकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. सन.2009 च्या निवडणूकीत 52.81 टक्के तर सन.2014 च्या निवडणूकीत 56.78 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत तब्बल 60.33 टक्के मतदान झाले असल्यामुळे स्वाभाविकपणे लढत चुरशीची होताना पाहायला मिळणार आहे.

मतदान 11 लाख अन्‌ उमेदवार 9

यंदाच्या निवडणुकीत 11 लाख 9 हजार 434 इतके मतदान झाले आहे. तर निवडणुकीच्या रिंगणात 9 उमेदवार उतरले आहेत. स्वाभाविकपणे लढत दोन प्रमुख उमेदवार म्हणजेच खा. उदयनराजे व नरेंद्र पाटील यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते निर्णायक ठरणार आहेत. त्याचप्रमाणे बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील आणि शैलेंद्र वीर यांना मिळणारी मते देखील निकालावर परिणाम करणारी दिसून येतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.