मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसं करण्याची सवय आहे, असा खोचक टोला शिवसेनेला लगावला होता. यावर संजय राऊत यांनी “जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहावी,” असा सल्ला दिला आहे.
तसेच या वेबसाईटवरील एक स्क्रिनशॉट देखील आपल्या ट्वीटसोबत शेअर केला आहे. यात कलाबेन डेलकर यांचा पक्ष म्हणून शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे.
सबसे अलग हुं..
पर गलत नही !!!
……………………
जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत…
त्यांचा हा जळफळाट आहे..
जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा..
शिवसेना जिंदाबाद!!! pic.twitter.com/c934vQqv0w— Sanjay Raut (@rautsanjay61) November 5, 2021
संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “‘सबसे अलग हुं.. पर गलत नही!’ जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत, त्यांचा हा जळफळाट आहे. जरा ही भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट पहा. शिवसेना जिंदाबाद!”
दरम्यान, नारायण राणेंनी दादरा-नगर हवेलीतील संजय राऊतांना देखील टोला लगावला. “गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.”
“कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही”, असे नारायण राणे म्हणाले.
“शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतेय. मोदींचं सरकार ३०३ जागांसह बहुमतात आहे. तुम्ही एका जागेनिशी धडक मारणार म्हणताय. पण धडक कशी असते हे तुम्हाला माहिती नाही. दिल्लीला धडक मारायला आलात तर जागेवर डोकं राहणार नाही. तिथं डोक्याविना संजय राऊत दिसतील”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली.