मुंबई – न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना हटविण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत एसटी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.
सदावर्ते यांच्या जागी आता ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेली ती आता वाचणार आहे. एसटी टिकवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी टिकेल तर आपण टिकू, असे राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे म्हणाले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी हटविल्यानंतर सदावर्ते यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. माझ्याकडे 75 हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे. मी 75 हजारांहून अधिक लोकांचा वकिल आहे. ज्या युनियन होत्या त्या बाद झालेल्या होत्या. त्या युनियनकडे एक टक्काही कष्टकरी नाही आणि मान्यता रद्द झालेल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.