पुणे – शहरात गेल्या 24 तासांत झालेली करोना बाधितांची वाढ ही 4 हजार 653 असून, 46 बाधितांचा मृत्यू झाला. त्यातील सात जण पुण्याबाहेरील आहेत. दिवसभरात 20 हजार 73 संशयितांच्या स्वॅबटेस्ट करण्यात आल्या आहेत.
आजपर्यंत केलेल्या 15 लाख 19 हजार 787 संशयितांच्या चाचणीपैकी 2 लाख 78 हजार 099 रुग्ण बाधित आढळले असून, त्यातील 2 लाख 35 हजार 597 बाधित बरे झाले आहेत. यामध्ये शुक्रवारी डिस्चार्ज दिलेल्या 3 हजार 337 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच रुग्णांच्या समस्यांमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात घडलेली अशीच एक घटना सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हायरल पोस्टनुसार जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये प्रवेश मिळत नसल्याने एका रुग्णाने चक्क गेटवर चढून एंट्री केली. या पोस्टसोबतच त्या तरुणाचा फोटो देखील व्हायरल झाला आहे.
काय आहे ‘ती’ व्हायरल पोस्ट?
‘दोन दिवसांपूर्वी रात्री 9 च्या सुमारास जंबो कोविड हॉस्पिटल बाहेर एक बॉडी बिल्डर तरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या हातात कागद पत्र होती आणि तो सातत्याने कोणाला तरी फोन लावत होता. अखेर अर्धा पाऊण तासाने त्याचा संयम सुटला. कॉल सेन्टरचा फोन उचलत नाहीत.. मी सातत्याने फोन करतोय.. दरवाजा उघडा असे म्हणत त्याने पुन्हा सुरक्षा रक्षकांना जंबो चे मेनगेट उघडायची विनंती केली. आम्हाला जोपर्यंत रिसेपशन मधून सांगत नाहीत तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही, असे म्हणत सुरक्षा रक्षकांनी शांततेत नकार दिला. एव्हाना हा तरुण थरथरू लागला होता. ‘मी पॉझिटिव्ह आलोय, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, मी सर्व कागदपत्र आणि सीसी सेंटर मधून लिहून आणलंय, दरवाजा उघडा नाहीतर मी दरवाजावरून चढून आत येईल ‘ असे कापऱ्या स्वरात धमकवाले.यावर सुरक्षा रक्षक शांतच राहिले…अखेर त्या तरुणाने पॅंट मध्ये कागदपत्र खोवले आणि सर्व बळ एकवटत सहा सात फुटाच्या दरवाजावर चढून ‘ जंबो ‘ प्रवेश केला….’
दरम्यान, पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे आजपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. आजपासून शहरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. करोना प्रसाराचा वेग पाहता नागरिकांनी विषाणू संदर्भातील सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.