कागल : अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास, मी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो, असे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांचा पक्ष दोन-दोन उपमुख्यमंत्रीपदे मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हसन मुश्रीफ यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास मी मुख्यमंत्री होणार नाही. पण उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो. मी अल्पसंख्याक असल्याने मला चांगली मला संधी मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. काही राज्यात दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत. आपल्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नये, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, जर मला एवढे सगळे मिळणार असेल, तर आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य देखील झाला नाही, त्याला मत देऊन आपले मत फुकट घालवू नका. मागील 25 वर्षांपासून तुम्ही मला निवडून देत आहात. तुमच्या आशीर्वादाने मी 19 वर्षे मंत्री झालो. आता पुढची पाच वर्ष मला संधी दिली, तर मी तुमचा हमाल म्हणून काम करेन. मला एक लाखाचे मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडे करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात, असा टोला हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगेंना लगावला.
महायुती-मविआकडून चेहरा नाही
महायुती आणि महाविकास आघाडीचे पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असले तरी दोघांकडूनही आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नाही. “आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत” असे महायुतीने म्हटले आहे. तर, “निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदासाठीचा नेता ठरवू, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.