माझा एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसेशी संबंध नाही – फरेरा

मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा यांनी एल्गार परिषद तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. तसेच माझा संबंध असल्याचा आरोप करणारा एकही पुरावा पोलिसांकडे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

फरेरा यांच्यासह वेर्णन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर त्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे.

फरेरा यांच्यासाठी अ‍ॅड्. सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला असून. आपण ‘भारतीय असोसिएशन पीपल्स लॉयर्स’ (आयएपीएल) या संस्थेचे सदस्य आहोत. याच संस्थेचे पदाधिकारी असलेल्या आणि या प्रकरणी सहआरोपी असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असल्यामुळेच आपल्याला अटक करण्यात आल्याचा दावाही फरेरा यांच्यातर्फे करण्यात आला आहे.

मी वकील आहे आणि आदिवासींसाठी काम करतो. सुरुवातीला या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात माझ्या  नावाचा समावेश नव्हता. परंतु पुरवणी आरोपपत्रात मला आरोपी दाखवण्यात आले आहे. मला आरोपी दाखवण्यासाठी नऊ पत्रे आणि दोन साक्षीदारांचे जबाब पुरावे म्हणून सादर करण्यात आले. पण या पुराव्यांतून माझा शहरी नक्षलवादाशी संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद फरेरा यांच्या वतीने करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)