नगर -विनयभंग गुन्ह्याच्या प्रकरणात मला अटक होईल, म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही.
मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन घेणार नाही. कारण मी गुन्हा केलेलाच नाही, असे शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे म्हणणे आहे.
काळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रक काढत माहिती दिली आहे. किरण काळे यांनी म्हटले आहे पोलिसांच्या सर्व कारवायांना सामोरे जायची आमची तयारी आहे. विरोधकांनी आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे.