आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग १ )

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर 
चित्रपट हे नेहमीच ठराविक प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात. विशेषतः तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून सिनेमांची निर्मिती केली जाते असं म्हणणं तितकसं वावगं ठरणार नाही. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले बालचित्रपट तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यातही मुलांचे भावविश्‍व जपणारे सिनेमे तर फारच कमी. या सगळ्यामागं बॉक्‍स ऑफिसवर कमाई हा विषय तर आहे; पण त्याहूनही असे चित्रपट बनवण्यासाठी लागणारी प्रगल्भ मानसिकतेची वानवा.

या सिनेमांची गरज या प्रेक्षकवर्गाकडं दुर्लक्ष आणि या विषयाप्रती असणारी संवेदनहीनता हेदेखील मुद्दे आहेत. शेवटी मनोरंजन हे एकमेव ध्येय डोळ्यापुढं ठेवून बनवलेल्या गल्लाभरू सिनेमांच्या भाऊगर्दीमध्ये लहान मुलं, त्यांच्या भावना, त्यांची मानसिकता, त्यांचं भावविश्‍व यांना गौणच स्थान दिलं गेलं; पण म्हणतात ना काही लोक असेही असतात, ज्यांना कायम प्रवाहाविरुद्ध काम करायची सवय असते. असाच एक नील माधव पंडा नावाचा अवलिया दिग्दर्शक त्यानं असा चित्रपट बनवला, ज्यात एक अत्यंत सामान्य, गरीब मुलगा केंद्रस्थानी होता.

या सिनेमाला राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2010 मध्ये हा चित्रपट कान्स महोत्सवात दाखवला गेला. तर 2011 मध्ये तो भारतात प्रदर्शित झाला. अर्थात हा चित्रपट म्हणजे “आय ऍम कलाम.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटाची कथा आहे छोटू (हर्ष मायर) उर्फ कलामची. राजस्थानच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारा छोटू अत्यंत बुद्धिमान मुलगा आहे. त्याला शिक्षणाची प्रचंड आवड आहे; मात्र घरच्या गरिबीमुळं त्याची आई त्याला एका मानलेल्या भावाच्या भाटी (गुलशन ग्रोवर)च्या ढाब्यावर कामासाठी सोडते. छोटू आपल्या कामानं भाटीचं मन जिंकतो. याच दरम्यान टीव्हीवर छोटू भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे कलामांचं भाषण ऐकून प्रेरित होतो आणि स्वत:चं नाव कलाम ठेवतो. सोबतच ठरवतो, की त्यांच्यासारखंच शिक्षण घेऊन मोठ व्हायचं.

या कालात छोटू चहा देण्यासाठी तिथल्या राजाच्या पॅलेसरूपी हॉटेलवर जात असतो. तिथं त्याची मैत्री राजकुमार रणविजय (हसन साद) सोबत होते. रणविजय छोटूला त्याचे कपडे, पुस्तके देत असतो; मात्र भाटीकडं काम करणारा दुसरा मुलगा लपटन (पितोबेश त्रिपाठी) याला छोटूचे होणारे कौतुक आवडत नसल्यामुळं तो ती पुस्तकं जाळून टाकतो. एकदा छोटूला रणविजयच्या खोलीतून येताना तिथले नोकर पाहतात व त्याच्यावर चोरीचा आळ घेतात; मात्र रणविजयला बोलणी बसतील, म्हणून छोटू तिथं काहीच बोलत नाही व सरळ घरी येऊन डॉ. कलामांना भेटण्यासाठी दिल्लीला निघतो. छोटू डॉ. कलाम यांना भेटतो का, ते त्याला काय संदेश देतात, रणविजय आणि छोटूची भेट होते की नाही या सगळ्या गोष्टी पडद्यावर पाहणंच योग्य ठरेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)