नवीदिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पाही वादळी ठरत आहे. सलग तीन दिवस संसदेतील, लोकसभा आणि राज्यसभेच्या अशा दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकले नाही. राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्य, अदानी प्रकरण आणि एजन्सीचा गैरवापर यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर आरोप करत मोठा आक्षेप नोंदवला आहे. यासाठी मोइत्रा यांनी एक ट्विट केले आहे.
महुआ मोइत्रा यांनी ट्विटमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर माईक बंद केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “गेल्या तीन दिवसांत सभापती ओम बिर्ला यांनी केवळ भाजप खासदारांना माईकवर बोलण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर सभागृह तहकूब केले. एकाही विरोधी खासदाराला बोलू दिले नाही. लोकशाही धोक्यात आली आहे.” या ट्विटसाठी मी तुरुंगात जाण्यासही तयार असल्याचे देखील टीएमसी खासदार यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.
अधीर रंजन चौधरी यांनी पत्र लिहिले
यापूर्वी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही माईक बंद केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी सभापतींना पत्रही लिहिले आहे. ते म्हणाले की, माझ्या सीटजवळील माईक गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. मी माझे म्हणणे सभागृहासमोर मांडू शकत नाही.
सलग तिसऱ्या दिवशीही काम होऊ शकले नाही
सरकार आणि विरोधक यांच्यात जोरदार बाचाबाचीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग तिसऱ्या दिवशी कामकाज होऊ शकले नाही. लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार करत आहेत. राहुलच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. त्याचवेळी अदानी मुद्द्यावर जेपीसीच्या मागणीवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत आहे.