कॉंग्रेस शिवसेनेला हिंदूत्वापासून दूर नेत असल्याचा दावा
मुख्यमंत्री ठाकरे “एनआरसी’च्या बाजूने असल्याचेही वक्तव्य
पुणे – “मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. मात्र, कॉंग्रेस शिवसेनेला हिंदूत्वापासून दूर नेत आहे. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेसचा डाव समजून घ्यावा,’ असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिला.
कोथरूड विधानसभा मतदारासंघातील प्रलंबित विकासकामांबाबत पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “शिवसेना होती म्हणून मुंबईत मराठी माणूस राहिला, मुंबई दंगलीत मराठी माणसाचे रक्षण झाले. मुख्यमंत्री ठाकरे नुकत्याच एका मुलाखतीत एनआरसी कायद्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, असे सूतोवाच केले आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य आमच्या भूमिकेशी सहमत आहे, असे सरळसरळ दिसते. मग, मुख्यमंत्री राज्यात हा कायदा लागू करणार का? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर “भाजपने विश्वासघात केला’ या ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत यावेळी पाटील यांनी “हे सरकार डिसेंबरपर्यंत टिकले, तर ‘कोणी कोणाचा विश्वासघात केला हे कळेल’ असे सांगत राज्यात पुन्हा सत्ताबदलाचे भाकितही केले.
राज्यात एनआरसी कायदा तसेच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करून शिवसेनेने आपले हिंदूत्व कायम असल्याचे दाखवून द्यावे
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप.