‘मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक; मृत्यू आणि तुरुंगाला कधीच घाबरलो नाही’

पुणे – “मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक असल्याने मृत्यू आणि तुरुंगाला कधीच घाबरलो नाही. मी पत्रकारिता करताना दाऊद इब्राहिम, छोटा शकीलपासून अनेक मोठ्या अंडरवर्ल्डचे फोटो काढले आहेत. तसेच, दाऊद इब्राहिमला दमदेखील दिला आहे, असा दावा करत त्या काळात बाळासाहेब ठाकरे माझी “फायरब्रॅंड एडिटर’ अशी ओळख करून द्यायचे,’ अशी आठवण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे सांगितली.

बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त राऊत पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, शरद पवारांना जाणता राजा ही पदवी लोकांनी प्रेमापोटी बहाल केली आहे. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे. यासाठी, सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बळ देण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यात 105 आमदारांचा विरोधी पक्ष असून त्या सर्वांनी सरकारला किमान वर्षभर काम करण्याची संधी दिली पाहिजे. आज कुणीही “खिचडी सरकार’ म्हणत नाही. कारण, या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि मार्गदर्शक शरद पवार आहेत. विरोधी पक्षानेही चांगली भूमिका मांडावी अन्यथा त्यांची प्रतिमा खलनायकासारखी रंगविली जाईल.

महात्मा गांधी सर्वांत मोठे हिंदू नेते
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून कॉंग्रेसने हिंदुत्ववादी पक्षाबरोबर युती केल्याने सतत टीका होत आहे. मात्र, देशाचा इतिहास कॉंग्रेसला वगळून लिहिणे अशक्‍य आहे. या देशात महात्मा गांधी सर्वांत मोठे हिंदू नेते असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

निकालाआधी आघाडीचं ठरलं…
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची खेळी आमच्या लक्षात आली होती. विधानसभा निवडणुकीत भाजप शब्द पाळणार नसल्याने शिवसेना सावध होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून शरद पवार आणि आमची चर्चा सुरू होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. तसेच, या सत्ता स्थापनेत भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांचा हातभार लागल्याची टिप्पणी राऊत यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.