हलदिया – तृणमुल कॉंग्रेसचे बंडखोर नेते सुवेंदु अधिकारी यांनी पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला छेद देत आज त्यांच्या धोरणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बंगाली आणि बिगर बंगाली ही चर्चा मला मान्य नाही.
मी प्रथम भारतवासी आहे आणि नंतर बंगाली आहे. बंगाल मध्ये बाहेरील राज्यातून येणाऱ्यांना बिगर बंगाली म्हणून त्यांची अवहेलना करणे आम्हाला मान्य नाही असे म्हणत त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांच्या बंगाल मधील प्रचाराला आक्षेप घेताना बंगाल बाहेरचे लोक येथे येऊन हस्तक्षेप करीत असल्याची टीका गेले काही दिवस सुरू केली आहे त्याला अधिकारी यांनी आज विरोध केला.
पक्षात सध्या पक्षापेक्षा व्यक्तींनाच महत्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. स्वातंत्र्य सैनिक सतीशचंद्र सामंता यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर ही टीका केली.