केसेस आणि नोटीसांची मला सवय आहे; तुम्ही शांत राहा!

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन ; उद्या ईडी करणार चौकशी

मुंबई – इलेक्‍ट्रनिक व्होटिंग मशीन हटवा, लोकशाही वाचवा, असा हुंकार करत महाराष्ट्रात विरोधी पक्षांची महाआघाडी साकारणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूरप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)े नोटीस बजावल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नोटीसीवरून मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरण्याचा तसेच ठिकठिकाणी बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता स्वत: राज यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. इतक्‍या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच 22 ऑगस्टला शांतता राखा. जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

दादर येथील कोहिनूर स्क्वेअर या इमारतीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना चौकशीचे समन्स जारी केले आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयात गुरुवारी, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांची चौकशी होणार आहे. या समन्समुळे मनसेसह राज्यातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभीमानी शेतकरी व अन्य विरोधी पक्षांनी राज ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा जाहिर केला आहे.

भाजपाचे हे दबावाचे राजकारण असून त्याला आम्ही भीक घालत नसल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे गुरुवारी तणाव निर्माण होण्याची शक्‍यता होती. त्यापार्श्वभूमिवर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू, असे राज ठाकरे म्हणाले. इतक्‍या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा.

सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका!

गुरुवारी चौकशीच्या दिवशी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे. पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)