मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस

मुंबई – मी केवळ भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. अन्य घटक पक्षाच्या युतीचा मुख्यमंत्री आहे. मी पुन्हा येईलच हे मी आधीच सांगितले आहे. जनता मुख्यमंत्री ठरवत असते. प्रसार माध्यमे त्या विषयी संभ्रम पसरवत असले तरी त्याची फिकीर करू नका असे शब्द प्रयोग वापरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

भाजप आणि शिवसेने यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार असली तरी मुख्यमंत्री कोणाचा यावरून दोन्ही पक्षांकडून आडूनआडून वेगवेगळे इशारे दिले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या विधानांना महत्व आहे. विधानसभांच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरूनही भाजप आमदारांच्या मनात धास्तीचे वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की कोणतीहीं जागा आपण गमावणार नाही.

युतीतील जागा वाटपात कोणतीही जागा आपल्याकडे येऊ शकते असे प्रतिपादन करीत त्यांनी जागा जाण्याची भीती असणाऱ्या आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असे मानले जात आहे. आपल्या सरकारच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले की आम्ही आरक्षण, संरक्षणाचे प्रश्‍न सोडवू शकलो आहोत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करून त्यांची अस्वस्थता कमी करू शकलो आहोत. या आधीच्या कोणत्याहीं सरकारला जे जमू शकले नाही ते आम्ही करून दाखवले आहे असा दावाहीं त्यांनी यावेळी केला.

माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. माझ्याकडे ना कोणता कारखाना आहे ना कोणती संस्था. त्यामुळे मोकळेपणाने मला काम करता आले असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पुढील 15-20 वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्ष म्हणून तयार करणे ही आपलीच जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी नढ्‌डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदि नेत्यांची यावेळी भाषणे झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)