मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली. पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आपले मुद्दे ठेवत असताना कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असे म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचे आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असे थेट आव्हान दिले.
जुलै महिन्यांत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजींचा वाढदिवस असतो. त्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्याचे विचार पुढे नेले पाहिजे असं राशीत लिहिलंय. माझ्यासमोर आज बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
आरक्षणाच्या मुद्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यात या दोन्ही समाजासाठी तरतूद केली आहे.
विधानसभेत आज 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला 81 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे.
भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी 216 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने आक्रमक असलेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. तर पुरवणी मागण्यात इंदु मिलसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.