पराभवाची जबाबदारी मी स्विकारतो – अशोक चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभारी देऊ आणि सत्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी लढा यापुढेही कायम ठेवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण बोलत होते. कॉंग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, कॉंग्रेसला यश मिळू शकले नाही, ही आमच्यासाठी मन:स्वी दु:खाची बाब आहे, अशी नाराजी व्यक्त करीत या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे कार्यकर्ते व कॉंग्रेस पक्षावर विश्वास दर्शवणाऱ्या लाखो मतदारांचे त्यांनी आभार मानले.

लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो असे सांगत या निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आणि सर्व उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाबद्दल पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल असे सांगून आपण कायम कॉंग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी कटिबद्ध राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नांदेडकरांना हवा होता बदल
नांदेडमधील स्वत:च्या पराभवाबद्दल ते म्हणाले, येथील जनतेने चव्हाण कुटुंबियांवर कायमच प्रेम केले आहे. अनेक निवडणुकींमध्ये नांदेडकरांनी आमच्यावर विश्वास दाखवून सेवेची संधी दिली. यावेळी कदाचित त्यांना बदल हवा होता. त्यामुळे नांदेडच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. मात्र, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करून जातीयवादी पक्षांना मदतच केली. त्यामुळे अनेक मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागले, अशीही भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.