पुणे – ध्वनीच्या सहा पट वेगाने अंतर कापत, कोणत्याही हवाई सुरक्षा ‘रडार’ला सहजपणे चकवा देऊ शकेल, अशा अतिवेगवान स्वदेशी हायपरसोनिक मिसाइल तंत्रज्ञानाची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. या मिसाइल तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले लॉन्चिंग तंत्रज्ञान ‘डीआरडीओ’च्या पुण्यातील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) हायपरसोनिक मिसाइल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिसा राज्यातील मालासोर येथे या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात आली. ही भारताचे मोठे यश मानले जाते. विशेषत: संरक्षण संशोधन आणि स्वदेशी निर्मिती या दोन्हींसाठी हा एक मैलाचा टप्पा ठरणार असल्याचे संरक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. या महत्त्वाच्या कामगिरीसाठी डीआरडीओच्या पुण्यातील रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट (आर ऍन्ड डीई) या प्रयोगशाळेनेदेखील भरीव योगदान दिले आहे.
“मिसाइल’ला योग्य गती देणे, तिचे उद्दिष्ट निश्चित करणे, मिसाइलची वाहतूक आणि उद्देष्टपूर्तीपर्यंतच्या प्रवासावर लक्ष ठेवणे अशी महत्त्वपूर्ण कामे या लॉन्चिंग सिस्टमद्वारे केली जातात. त्यामुळे मिसाइल प्रक्षेपणासाठी आवश्यक यंत्रणेची निर्मितीदेखील त्याननुसार केली जाते.
संस्थेने हायपरसोनिकसाठी तयार केलेली प्रक्षेपण यंत्रणा अशाप्रकारची पहिलीच लॉन्चिंग यंत्रणा असून, यामध्ये मिसाइलसाठी आवश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञाने सज्ज असलेली ही यंत्रणा असल्याचे प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.