सोलापूर : डफरीन चौक येथे मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनावेळी हवेत सोडण्यासाठी लागणाऱ्या फुग्यांमध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन गॅस भरणारा आणि अन्य पाच असे एकूण सहाजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी पहाटे सव्वा पाच वाजता घडली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे काही वेळ गोंधळ उडाला.
चंद्रकांत भिमण्णा खडाखडे (वय 36, रा. सोरेगाव, तालुका उत्तर सोलापूर), शमशुल अहमद सुलेमान शेख (34), गोपाळ मुंदडा (20), मानसी दिपक मुंदडा (20), विनायकसिंग छोटूसिंग परदेशी (30) आणि हरिदास मोहन माने (20) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी पहाटे सोलापुरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेसाठी या परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक धावपटू जमा झाले होते. दरम्यान, अचानक गॅसचे फुगे भरताना टाकीचा स्फोट झाला.
या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने एकच गोंधळ उडाला. यात 6 जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर लगेच घटनास्थळी बॉंब शोधक पथक दाखल झाले. दरम्यान, गॅसचे फुगे भरत असताना तेथे गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.