हैदराबाद – हैदराबाद येथील एका तरूणाची अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील थॉम्सटन शहरात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री ही घटना घडली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
हैदराबादच्या चंचलगुडा भागात राहणारा महंमद अरीफ मोहीउद्दीन यांचे थॉम्सटन येथे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या घराचे दार उघडताच त्यांच्यावर वार करण्यात आले. हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना सोमवारी याबाबतची माहिती देण्यात आली.
मोहीउद्दिन यांच्या मागे पत्नी आणि 10 महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. ते गेली 10 वर्ष जॉर्जियात किराणा मालाचे दुकान चालवतात. जानेवारी महिन्यात ते आपल्या बाळाला भेटण्यासाठी आले होते. चार समाज कंटक त्यांना मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. हल्लेखोरांनी पैशांसाठी त्यांचा खून केला असावे, असे त्यांच्या पत्नीच्या जवळच्या नातलगाने सांगितले.
पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणात तीन जणांना अटक केली. मात्र, चौथा आरोपी अद्याप फरार आहे. हत्येचा हेतू आणि अन्य तपशील अद्याप समजला नसल्याचे आम्हाला सोमावारी रात्री कळवण्यात आले, असेही या नातेवाईकांनी सांगितले.
रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास (अमेरिकेतील शनिवारची रात्र) मी पतीशी बोलले. अर्ध्या तासाने फोन करतो, असे ते म्हणाले. मात्र दोन तास झाल्यावरही त्यांनी फोन केला नाही. आम्ही फोन केले मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामूळे अन्य परिचितांकडे फोन करून आम्ही जाणून घेतले. त्यावेळी त्यांचा खून झाल्याचे आम्हाला समजले, असे त्यांची पत्नी फतिमा यांनी सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा तातडीने मिळावा म्हणून मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.