हैद्राबाद बलात्कार प्रकरण: ‘त्या’ आरोपींचे मृतदेह 9 तारखेपर्यंत सुरक्षित ठेवा

तेलंगण उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

नवी दिल्ली : तेलंगणची राजधानी हैद्राबादमध्ये महिला डॉक्‍टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसेच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैद्राबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. या घटनेचे काहींनी समर्थन तर काहींनी विरोध केला होता. परंतु आता याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.

दरम्यान, या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. शुक्रवारी पोलीस आणि आरोपींच्या झालेल्या चकमकीत हे चारही जण ठार झाले होते. यापूर्वी अटकेत असलेल्या या आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते.

आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली होती. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.मोठा तपास केल्यानंतर आम्ही चार आरोपींना अटक केली होती. 30 तारखेला त्यांना अटक करण्यात आली. 4 तारखेला आम्हाला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्थखळी लपवल्या असल्याचे सांगितले. आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला असता चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती सज्जनार यांनी शुक्रवारी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.