पोलिसांवरील हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण
नवी दिल्ली : हैदराबादमधील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर चार जणांनी सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण देशभरामध्ये उमटताना दिसत आहे. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आंदोलने केली जात आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये या प्रकरणानंतर संतापाची लाट पसरली आहे. संतप्त जमावाने पोलिसांवर चप्पल फेकून मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
#WATCH: Police lathicharged on locals who hurled slippers on police outside Shadnagar police station, where the accused in rape&murder case of the woman veterinary doctor were lodged earlier today. Accused have been shifted to Chanchalguda Central Jail. #Telangana pic.twitter.com/qXOc0SVOyS
— ANI (@ANI) November 30, 2019
आरोपी ठेवलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच आरोपीला आमच्या हवाली द्या, अशी मागणी करत काही जणांनी पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या जमावाला अडवले. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर चप्पल फेकून मारल्या. हैदराबादच्या शादनगर पोलीस स्टेशन बाहेर ही घटना घडली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार आरोंपीपैकी तीन आरोपी हे 20 वर्षांचे आहेत. तर एकाचं वय हे 26 आहे. हे चारही आरोपी तेलंगणामधले आहेत. हैदराबाद पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.