मुबंई – भाजपच्या अनेक रथीमहारथींनी हैदराबाद महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे केंद्रिय गृहमंत्र्यांसहित अनेक भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हैदराबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केल्याने त्यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. आता हाच पॅटर्न मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत वापरला जाण्याची शक्यता आहे.
कारण हैदराबादमध्ये भापजच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर उतरून पक्षाचा प्रचार केल्याने लोकांवर त्याचा प्रभाव पडला. आता मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी हीच रणनीती वापरली जाण्याची शक्यता आहे. याचाच भाग म्हणून मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत तीन दिवस तळ ठोकून राहणार आहेत.
जेपी नड्डा दि. 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. हे तीन दिवस ते मुंबईतच मुक्कामी राहणार आहेत. या तीन दिवसांत भाजपाची पुढील व्यूहरचना आखली जाणार असल्याची शक्यता आहे.
यादरम्यान विचार-मंथन-सभा आयोजित केल्या जाणार. त्यामुळे हैदराबाद पॅटर्न मुंबईतही यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत.