दुबई -यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा व कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 2 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय हैदराबादच्या फलंदाजांनी साफ चुकीचा ठरवला.
सलामीवीर वॉर्नर व साहा यांनी डावातील 10 व्या षटकातच संघाला शतकी सलामी दिली. यावेळी वॉर्नर जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. मात्र, त्याचवेळी रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर तो 66 धावांवर बाद झाला. त्याने 34 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 2 षटकार फटकावले.
तो बाद झाल्यावर साहाने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. अर्धशतक पूर्ण झाल्यावर शतकाकडे कूच करत असलेला साहादेखील अतिआक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 45 चेंडूत 12 चौकार व 2 षटकार फटकावताना 87 धावांची खेळी केली. बाद होण्यापूर्वी त्याने पांडेच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली व संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. तो बाद झाल्यावर केन विल्यमसनने पांडेला साथ दिली.
विल्यमसनपेक्षा पांडे जास्त आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता. या जोडीने 18 व्या षटकात संघाच्या धावसंख्येचे द्विशतक फलकावर लावले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाला 20 षटकांत 2 गडी गमावून 219 असा धावांचा डोंगर उभारून दिला. या सामन्यात साहाने अक्रमक फलंदाजी करताना आपल्यावरील कसोटी फलंदाज असा शिक्का पुसून काढण्याचा प्रयत्न केला.
हैदराबादसाठी औपचारिकता
दिल्लीविरुद्धचा सामना म्हणजे हैदराबाद संघासाठी केवळ औपचारिकताच होती. त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यातच जमा आहे. त्यामुळे हा सामना हरला काय किंवा जिंकला काय त्यांना गमावण्यासारखे काहीच नव्हते. ज्या पद्धतीने नियोजनबद्ध खेळ त्यांनी या सामन्यात केला तसाच खेळ त्यांनी यापूर्वीच्या सामन्यांत केला असता तर त्यांना प्ले-ऑफ गटात स्थान मिळाले असते.
संक्षिप्त धावफलक – सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 2 बाद 219 धावा. (वृद्धिमान साहा 87, डेव्हिड वॉर्नर 66, मनीष पांडे नाबाद 44, केन विल्यमसन नाबाद 11, रवीचंद्रन अश्विन 1-35, अनरिच नोर्जे 1-37).