नवी दिल्ली – मोहम्मद नबीच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव करत आगेकूच केली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 129 धावांची मजल मारली. यावेळी 130 धावांचे आव्हान घेऊन प्रत्युत्तरात उतरलेल्या हैदराबादने नेहमीच्या शैलीत वेगवान सुरुवात केली. यावेळी जॉनी बेअरस्ट्रोने वॉर्नरच्या साथीत 6.5 षटकांत 68 धावांची सलामी दिली. यावेळी बेअरस्ट्रो 28 चेंडूत 48 धावा करून बाद झाल्यानंतर वॉर्नरही 10 धावा करून परतल्याने हैदराबादची 2 बाद 68 अशी अवस्था झाली. यानंतर शंकर, मनिष पांडे आणि दिपक हुडा अनुक्रमे 16, 10, 10 धावा करून परतल्यानंतर युसुफ पठाण आणि मोहम्मद नबी यांनी हैदराबादला 18.3 षटकांत विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ 11 धावा तर शिखर धवनदेखील 12 धावा करून बाद झाल्याने दिल्लीची 2 बाद 36 अशी अवस्था झाली. यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी सावध खेळ करत दिल्लीला 8.3 षटकांत आपले अर्धशतक फलकावर लावले. यानंतर धावगती वाढवण्याच्या नादात ऋषभ पंत बाद झाल्याने दिल्लीची 3 बाद 52 अशी अवस्था झाली. यानंतर आलेला तवेतिया आणि इन्ग्राम हे दोघेही 5 धावा करून परतल्याने दिल्लीचा निम्मा संघ केवळ 75 धावांमध्ये परतला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ख्रिस मॉरिसच्या साथीत संघाला शंभरीच्या जवळ आणले. यावेळी ही जोडी दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून देईल असे वाटत असताना 43 धावांवर खेळनाऱ्या अय्यरला बाद करत रशिदने ही जोडी फोडली. यानंतर मॉरिस देखील लागलीच परतला. मात्र, अक्षर पटेलने 13 चेंडूत 23 धावांची खेळी करत दिल्लीला 129 धावांची मजल मारून दिली.