घरोघरी जाऊन घ्यावी लागत आहे मतदारांची भेट
पिंपरी – मतदारांच्या पडताळणीसाठी हायब्रिड-बीएलओ ऍप विकसित करण्यात आलेले आहे. आता बीएलओंना मतदारांच्या घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून त्याची माहिती या ऍपमध्ये भरायची आहे. मात्र, नागरिकांतून असहकार्य होत असल्यामुळे हे ऍप बीएलओंसाठी डोकेदुखी ठरत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत 1 जानेवारी 2020 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी ऑनलाईन नॅशनल वोटर सर्व्हिसेस पोर्टल व वेबसाइटवर करायची आहे. याबरोबरच मतदार यादीतील नावाची दुरुस्तीची सुविधाही याच वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच मतदार यादी पडताळणी मोहिमेअंतर्गत हायब्रिड बीएलओ ऍपमध्येदेखील मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या ऍपसाठी पुढाकार घेतला असून, दी नॅशनल मोबाईल गर्व्हनन्स इनिशिएटिव्हअंतर्गत हे ऍप विकसित केले आहे. त्यामुळे, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांची पडताळणी याच ऍपद्वारे सुरू आहे.
ऍप वापरण्यास अडचणी
या ऍपमधून मतदारांची पडताळणी करताना बीएलओंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून बहुतांश बीएलओ हे शिक्षक आहेत. या शिक्षकांना शाळा सांभाळून निवडणुकीचे काम करावे लागते. मात्र, आता शाळेसोबत मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यास या बीएलओंना अडचणी येत आहेत. शिवाय शाळा सुटल्यानंतर वेळ काढला तर नागरिकही या कामासाठी सहाकार्य करीत नसल्याचे ओरड बीएलओमधून होवू लागली आहे. शिवाय अनेक बीएलओ वयस्कर आहेत. त्यांना हे ऍप वापरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने विकसित केलेले ऍप बीएलओंसाठी मात्र डोकेदुखीचे ठरत आहे. त्यामुळे, घरोघरी जाऊन पडताळणी करण्यापेक्षा पूर्वीसारखे शाळेमध्ये बसून मतदार नोंदणीविषयक कामे नेमावी अशी मागणी बीएलओमधून होऊ लागली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 354 बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत मतदारांच्या नावाच्या पडताळणीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी अवघे दहा दिवस राहिलेले असून बीएलओंनी राष्ट्रीय कर्तव्य समजून काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हायब्रिड-बीएलओ ऍप वापरणे ज्यांना जमत नाही त्यांनी मतदारांची आवश्यक ती कागदपत्रे आमच्याकडे जमा करावी, अशा सूचनाही सर्वांना दिलेल्या आहेत. मात्र, अद्याप याला बीएलओकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
– सुरेश पिसाळ, नायब तहसीलदार, भोसरी