हुसेन शेख करंडक हॉकी स्पर्धा : क्रीडा प्रबोधिनी उपांत्यपूर्व फेरीत

पुणे- क्रीडा प्रबोधिनीने विक्रम पिल्ले अकादमीचा 4-0 असा पराभव केला आणि हुसेन शेख करंडक हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.गतविजेता एक्‍सलन्सी अकादमी आणि हॉकी पुणे इलेव्हन या संघांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू आहे.

क्रीडा प्रबोधिनी संघाच्या विजयात वेंकटेश केंचे याने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला व पिल्ले अकादमीला निष्प्रभ केले. राहुल शिंदे व हरिष शिंगडी यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.

अन्य सामन्यात दोन वेळच्या विजेत्या एक्‍सल्नस अकादमी संघाला रेल्वे पोलिस बॉईज संघाच्या खेळाडूंनी चिवट झुंज दिली. एक्‍सलन्सी अकादमी संघाने 3-2 असा विजय मिळविला. एक्‍सलन्सी अकादमीच्या खेळाडूंना रेल्वे पोलिस बॉईजचा बचाव भेदणे कठिण गेले. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला हर्ष परमार याने संघाचे खाते उघले.

पण,रेल्वे पोलिस बॉईज संघाच्या उदय बारामतीकर याने 28व्या मिनिटाला गोल करीत बरोबरी साधली. उत्तरार्धात विनीत शेट्टी याने 37 व्या मिनिटाला गोल करून एक्‍सलन्सी संघाला आघाडीवर नेले. मात्र दहाच मिनिटांनी रोहन मुसळे याने बरोबरी साधणारा गोल केला. त्यांचा हा आनंद दोनच मिनिटे टिकला. सामन्याच्या 49व्या मिनिटाला अनिकेत मुथय्या याने एक्‍सलन्सी संघाचा विजयी गोल केला. हॉकी पुणे संघाला प्रभाकर अस्ताप अकादमी संघाने पुढे चाल दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.