पिंपरी – पती पत्नीच्या संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरले असतानाही ऐनवेळी पत्नीने नकार दिला. यामुळे झालेला खर्च पतीने मागितला. या कारणावरून दोन जणांनी पतीला मारहाण करीत दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना दिघी येथे घडली.
सुरज लक्ष्मण देवकर (वय 25, रा. गणेशनगर, बोपखेल) आणि अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत. धनंजय रामचंद्र दिसले (वय 44, रा. बोपखेल) असे मारहाणीत जखमी झालेल्या पतीनचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. 26) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दिसले आणि त्यांची पत्नी सुरेखा यांच्यात पटत नसल्याने ती सध्या भावाकडे माहेरी राहते. त्यांनी दोघांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरले. यासाठी फिर्यादी दिसले यांनी वकीलाची फी दिली तसेच इतर कागदपत्रे तयार केली. मात्र ऐनवेळी पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला. यामुळे दिसले यांनी आपल्या पत्नीकडे घटस्फोटाच्या कागदपत्रांसाठी झालेला खर्च मागितल्याने त्या दोघांमध्ये चार दिवसांपूर्वी भांडणे झाली. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना बेस बॉलच्या लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले.