शिर्सुफळ येथे नातवाच्या मारहाणीमुळे आजीचा मृत्यू
बारामती – पती-पत्नीच्या भांडणे सोडविणे शिर्सूफळ (ता. बारामती) येथील ज्येष्ठ महिलेला चांगलेच महागात पडले. नातूकडून खोऱ्याच्या दांड्याने झालेल्या मारहाणीमुळे जखमी झालेल्या या आजीचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. 2) मृत्यू झाला.
किसाबाई बन्सी आटोळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा नातू सूरज मच्छिंद्र आटोळे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप मच्छिंद्र आटोळे यांनी याबाबत फिर्या दाखल केली. दि. 29 सप्टेंबर रोजी शिर्सूफळमधील महादेव मळा येथे मारहाणीची ही घटना घडली होती.
सूरज आटोळे हे पत्नी अश्विनी हीला मारत असताना ही भांडणे सोडविण्यासाठी सूरजची आजी किसाबाईमध्ये पडल्या. सूरज याने खोऱ्याच्या दांड्याने त्यांना मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या किसाबाई यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.