ओतूर (प्रतिनिधी) – उंब्रज नं १(ता.जुन्नर) गावात जुन्नर येथे कोरोना पार्श्वभूमीवर गावात लॉकडाऊन सुरू असल्याने गावाबाहेरून आलेल्या वाहनांना गावात प्रवेश देण्यास मज्जाव केला असल्याने चेकपोष्टवर पोलिसांनी येथील शेतकरी कुटुंबाला घेवून जाणाऱ्या पीक अप जिपला अडवले असता.
पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीतुन अपमानास्पद वाटून राग अनावर झाल्याने घरी येऊन संबधीत पती पत्नीने घरातील विषारी औषध नाक्यावर आणले व पोलीस कर्मचाऱ्या समक्ष प्राशन केल्याने यातील अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४०) व त्यांचे पती रोहिदास कुषाबा शिंगोटे (वय ४५) यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले असता.
तेथे यावेळी उपचाराकरिता डॉकटर उपलब्ध झाले नसल्याने गावातील डॉ.कुटे हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले असता अनुजा रोहिदास शिंगोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रोहिदास यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नारायणगाव येथील डॉ.सदानंद राऊत हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.प्रथमोपचार करून तेथून त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान या कुटुंबाच्या नातलगांनी मयत अनुजा शिंगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शविला आहे.त्यांच्या मागणीतून संबंधित पोलीस कर्मचारी व आरोग्य विभाग यांनी केलेल्या दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई होण्याची मागणी त्यांनी केली आहे.
घटना घडल्यावर नगर कल्याण महामार्गावरील डॉ.कुटे हॉस्पिटल बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.उपविभागीय अधिकारी जितेंद्र डूड्डी,उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना,पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे,आर.सी.पी.चे ३६ जवान व पोलीस फौज फाट्यासह या ठिकाणी हजर झाले व जमवला पांगविला.
तसेच जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी देखील या ठिकाणी भेट देवून नातलग व अधिकारी यांची बाजू समजून घेवून सबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील सोनवणे यांनी केली.तर या ठिकाणी मृत अनुजा व गंभीर रोहिदास शिंगोटे यांचे नातलग दुःखित अंतःकरणाने टाहो फोडीत होते.येथे घटनेची माहिती घेण्यासाठी पुणे पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी धाव घेतली. सदर घटनेने संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.