नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोटच्या मुलीची हत्या करून पती-पत्नीने देखील आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही, म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा ही संपूर्ण घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
काय घडले नेमके?
विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गौळने गावचे असून ते पाथर्डी फाटा, सराफ नगर परिसरात राहत होते. त्यांनी मुलीला विष पाजलं, त्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली.पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असे आहे. मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
विजय माणिक सहाने यांच्यावर कोणतेही कर्ज नसताना त्यांनी अचानक कुटुंबासोबत हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन देखील घेतलं. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केली असावी. विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम, सोनं हे सगळं होतं. तरीदेखील त्यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.