सातारा – दारूबंदीच्या जावळी तालुक्यामध्ये तालुक्याचे मुख्य गाव मेढा येथे गांधीनगर वसाहतीमध्ये पती आणि पत्नीचा अति मद्य प्राशन केल्याने घरातच मृत्यू झाला असल्याची खळबळजनक माहिती बुधवार रात्री साडेआठ वाजता समोर आली. या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, जावळी तालुक्यामधील गांधीनगर येथे राहणारे अनिल शिवराम काटेकर (वय ४०), शेवंता अनिल काटेकर (वय ३५, रा. गांधीनगर मेढा) हे दांपत्य दुपारपासूनच स्वतःच्या राहत्या घरात प्रमाणा पेक्षा जास्त दारू पीत होते.
अति मद्य प्राशन झाल्यानंतर ते बेशुद्धावस्थेत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. दारूबंदीच्या जावळी तालुक्या मध्ये हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जावळी तालुक्यात यापूर्वी अनेकांचा दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र पती आणि पत्नीचा अति मद्यप्राशन करून मृत्यू होणे ही पहिलीच घटना घडल्याने संपूर्ण मेळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे करत आहेत.