सुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

सोलापूरात इच्छुक उमेदवारांची धांदल

सुशीलकुमार शिदे यांनी घेतले स्वामी समर्थ आणि सिद्धरामेश्वरांचे दर्शन

सुजात आंबेडकर यांचा सोलापूरकरांशी संवाद

सोलापूर – सोलापूर लोकसभेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वगळता अद्याप कोणाचीसुद्धा उमेदवारी जाहीर झाली नाही. पण युतीसह वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची निवडणुकीसाठी धांदल उडाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार –
सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे सोमवार 25 मार्च रोजी उमेवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्वत्र या दिवशी रंगपंचमीचा उत्साह असतानाच सुशीलकुमार हे उमेदवारी अर्ज भरून विजयाच्या रंगाची उधळण करणार असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून चार हुतात्मा पुतळा येथून मिरवणुकीने शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णयाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहेत. शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात आपला डेरा टाकला आहे. त्यांनी कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची बैठक घेऊन आघाडीचा धर्म पाळण्याची विनंती केली आहे.

दरम्यान शिंदे यांनी दोन दिवसांपासून मतदारसंघातील दौरा वाढविला आहे. शहरात ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज आणि त्यानंतर दुपारी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे त्यांनी दर्शन घेतले. शिवाय दर्गाहमध्ये जाऊन शिंदे यांनी चादर चढविली. अक्कलकोटमध्ये शिंदे यांनी दौरा केला असतानाच शिंदे यांच्या विरोधात उभे राहणारे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यासपीठावर अवतरले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेनंतर कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आंबेडकर उभारणार कि नाही हा अजून चर्चेचाच विषय असताना गुरुवारी त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी मात्र सोलापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या घोंगडे वस्ती येथील निवासस्थानी जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकाश आंबेडकरांची त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी नेला आहे. आंबेडकर निवडणुकीला उभारल्यास सुशीलकुमारांच्या अडचणी वाढणार आहेत .

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)