पुणे –बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या “जवाद’ या चक्रीवादळाचा पुण्यावर फारसा परिणाम होणार नाही. दरम्यान, शहर परिसरात पुढील 48 तास अंशत: ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर मात्र हवामान कोरडे राहणार असल्याने तापमान सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहर परिसरात बुधवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके पडून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यातच बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुण्यातही पुन्हा पाऊस पडणार का? अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देत, भारतीय हवामान विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे वरिष्ठ हवामानशास्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपि म्हणाले, “पुणे शहर आणि परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
पुढील तीन ते चार दिवस हलके धुके पडण्याची शक्यता आहे. तीन ते चार डिसेंबरला अंशत: ढगाळ वातावरण राहील. मात्र, त्यानंतर हवामान कोरडे राहील. गेल्या चोवीस तासांत कमाल तापमानात तब्बल सहा ते सात अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमान जवळपास समान आहे. त्यामुळेच शहरात थंडी जाणवत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले “जवाद’ चक्रीवादळ प्रमुख्याने तामिळनाडू, आंध्रप्रदेश या भागांमध्ये कार्यरत राहील. त्यामुळे राज्यात अथव पुणे परिसरात त्याचा फारसा परिणाम होणार नाही.’
दरम्यान, शहर परिसरात गुरुवारी (दि.2) देखील थंडीची कुडकुड जाणवत होती. तर, शहरातील बहुतांश भागात दाट धुके साचले होते. विभागाच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर येथे कमाल तापमान 19.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.