पुरुथा – इटा या चक्रीवादळामूळे ग्वाटेमाला इथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 50 वर गेली आहे. तर किमान 100 जण बेपत्ता झाले आहेत. या वादळाने जाता जाता मध्य अमेरिकेतल्या काही भागांना तडाखा दिला असून त्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि पूर आले आहेत.
अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर आणि दरडी कोसळण्यामुळे अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांच्या शोधाचे काम सुरू अहे. सॅन क्रिस्टोबल वेरापाझ इथे दरडी कोसळण्यामुळे अनेक जण गाडले गेले आहेत. क्युबाच्या मध्य भागाला या वादळामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी क्युबामधील कॅमेग्युएच्या पश्चिमेकडील भागात वादळामुळे सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. फ्लोरिडा, मियामी-डेड प्रांतांमध्ये इटा वादळमुळे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ग्वाटेमालामध्ये आणखी दोन दिवस पाऊस कोसळणार आहे.