सेऊल, (दक्षिण कोरिया) – जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला जोरदार फटका दिल्यानंतर हैशेन चक्रीवादळाने आपला रोख दक्षिण कोरियाकडे वळवला आहे. दक्षिण कोरियात सुमारे 100 घरांचे नुकसान झाले. तर रस्त्यांवर पुराचे पाणी वाहू लागल्याने वाहनेही वाहून जाऊ लागली आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आणि विजेचे खांबही कोसळले आहेत. सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये एकजण वाहून गेल्याची भीती आहे.
बुसान या किनाऱ्याजवळच्या शहरात खवळलेल्या समुद्राचे पाणी शिरले आहे. त्यात पाच जण जखमी झाले आहेत. मच्छीमारांच्या 80 बोटी समुद्रात बुडाल्या आहेत. तर गुएन्ग्जू अणुभट्टीलाही काम थांबवावे लागले आहे. या अणुभट्टीतून कोणत्याही किरणोत्सर्गाची भीती नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दक्षिण कोरियाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या शेकडो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. काही पूल आणि रेल्वेमार्गही बंद करण्यात आले आहे. किनाऱ्यावरील बोटी सुरक्षित ठिकाणी हलवल्या गेल्या आहेत. भूस्खलनाची भीती असल्याने सुमारे अडीच हजार नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे.
हैशेन चक्रीवादळामुळे जपानमधील अनेक इमारतींचे यामुळे नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पुराचे पाणी वाहू लागले आहे. दक्षिण जपानमधील मोठ्या भूभागातील वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. सोमवारी दुपारी हे वादळ दक्षिण कोरियामधील पूर्वेच्या किनारपट्टीजवळील सोक्चो शहराजवळून जाणार असल्याचे कोरियाच्या हवामानशास्त्र संस्थेने म्हटले आहे.
आता हैशेन चक्रीवादळाचा जोर मंदावला असून वाऱ्याचा वेग ताशी 108 किलोमीटरपर्यंत कमी झाला आहे. सकाळच्या सुमारास हाच वेग ताशी 144 किलोमीटरपर्यंत होता. आणखी सहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखीन कमी होण्याचा अंदाज आहे.
वादळादरम्यान रस्त्याजवळच्या खड्ड्यात पडल्याने एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. वादळाशी संबंधित अन्य दुर्घटनांमध्ये 38 जण जखमी झाल्याचेही जपानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे. हिरोशिमा आणि अन्य शहरातील शाळा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 10 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले होते. तसेच वादळ अपेक्षेपेक्षा कमी वेळेत सौम्य झाल्यामुळे जीवितहानी मर्यादित झाली आहे.