Hurricane Erin Threatens : एरिन चक्रिवादळाची तीव्रता वाढली; कॅरेबियन भूप्रदेशाबरोबर अमेरिकेच्या किनाऱ्यालाही धोका

सॅन जुआन (पुएर्टो रिको) : अटलांटिक समुद्रात निर्माण झालेल्या एरिन चक्रिवादळाची तीव्रता वाढली असून हे चक्रिवादळ आता श्रेणी ५ च्या क्षमतेचे झाले आहे, असे नॅशनल हरिकेन सेंटरने म्हटले आहे. हे वादळ आता कॅरिबेयन भूप्रदेशाच्या उत्तरेकडील भागात आहे. मात्र या भागाला हे वादळ थडकण्याची शक्यता नाही. पण वादळाच्या प्रभावामुळे कॅरेबियन भागाच्या इशान्येकडील या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळाची तीव्रता जशी वाढत जाईल, तसे पावसाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
एरिन हे २०२५ मध्ये अटलांटिक समुद्रात निर्माण झालेले पहिले वादळ आहे. अवघ्या २४ तासातच शनिवारी सकाळपर्यंत एरिन वादळाची तीव्रता श्रेणी ५ पर्यंत वाढली आहे. यामुळे वाऱ्याचा वेग दुपटीने वाढून ताशी १६० मैल इतका वाढला आहे. अवघ्या ९ तासात वादळाचा वेग ताशी ६० मैल इतका वाढला आहे. अल्पावधीतच हे वादळ आपल्या सर्वाधिक क्षमतेचे झाले आहे. रविवारी ळंध्याकाळपर्यंत त्याची क्षमता कमी होईल, असे मियामी नॅशनल हरिकेन सेंटरचे संचालक माईक ब्रेनेन यांनी सांगितले.
एरिन वादळ जमिनीपासून जवळ असल्यामुळे पूर किंवा भूस्खलनाचा धोका जास्त आहे. सेंट मार्टिन, सेंट बार्टस आणि सेंट मार्टेन या बेटांना या वादळाचा सर्वात जास्त धोका आहे. तुर्क आणि कैकोस बेटे आणि आग्नेय बहामासमध्ये उष्णकटिबंधीय वादळाच्या जोरावर वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या काळात एरिनचा आकार दुप्पट किंवा तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. वादळाची दिशा समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा अंदाज आहे. पण तरीही पुढील आठवड्यात फ्लोरिडा ते मध्य अटलांटिकपर्यंतच्या अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर शक्तिशाली वादळाचा परिणाम होऊ शकतो.





