पुणे – तोलाईप्रश्नी किशोर तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तोलाई कपातीबाबतचा अहवाल येत्या 22 ऑगस्टपर्यंत सादर करावा. त्यानंतर तोलाईबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत तोलणारांना काम करून देण्याच्या सूचना पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुणे बाजार समिती आणि दि पुना मर्चंट्स चेंबरला दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता मागील 6 महिन्यांपासून सुरू असलेली तोलणारांची उपासमार थांबणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे असणाऱ्या दुकानात तोलाई कपात करू नये, असे आदेश तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी 2014 मध्ये दिले होते. त्या आदेशाची दि पूना मर्चंट्स चेंबरने फेब्रुवारी महिन्यापासून अंमलबजावणी सुरू करत तोलणारांना काम देण्यास मज्जाव केला होता. फेब्रुवारीपासून तोलणारांची उपासमारी सुरू असल्यामुळे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, हमाल पंचायतने मागील आठवडाभर बेमुदत कामबंद आंदोलन केले. तरीही शासनाने निर्णय न घेतल्याने राज्यव्यापी बंदचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमिवर बुधवारी मुंबईत पणनमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत तोलाईप्रश्नी नेमलेल्या तोष्णीवाल समितीचा अहवाल येईपर्यंत तोलणारांना काम करून देण्याच्या सूचना पणनमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीस पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, भुसार सभापती किशोर भानुसघरे, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, वालचंद संचेती, अशोक लोढा आदी उपस्थित होते, अशी माहिती महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट यांनी दिली.
बैठकीत झालेला निर्णय
तोलाईप्रश्नी किशोर तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती यांचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीने येत्या 22 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा. तोपर्यंत तोलणारांना 50 किलो व त्यापुढील वजनमापावर तोलाई कपातीचे काम करून देण्याच्या सूचना पणनमंत्र्यांनी दिल्या.