पुणे : रुग्णालयाचे सगळे बिल भरा आणि मृतदेह घेऊन जावा, रुग्णालयाच्या या हट्टामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या मांडून उपोषणाला सुरुवात केली. दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर रात्री उशिराने रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
जहांगीर रुग्णालयात ३५ वर्षीय महिलेवर २८ नोव्हेंबरला किडनी ट्रान्सफ्लांट शस्त्रक्रिया झाली होती.
त्यानंतर तिची प्रकृती सुधारण्याऐवजी वेळोवेळी त्रास होऊन खालावत गेली. तिचा त्रास वाढल्यामुळे पुन्हा जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ७ नोव्हेंबरला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि आज (दि. ८) रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले, तरीही रुग्णाच्या मृत्यूनंतर हाॅस्पिटलकडून १५ लाख भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितल्याचे मृताचे भाऊ प्रताप होलीकर यांनी सांगितले. एवढे पैस भरूनही आमचा माणूस वाचला नाही. कर्जबाजारी झालो, आता एवढे पैसे आणू कोठून, अशी रुग्णालय प्रशासनास विचारणा केली. त्यानंतरही रुग्णालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेरच उपोषणाला सुरवात केली.
दरम्यान, रुग्णाच्या मृत्यूनंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. कसल्याही प्रकारची त्यांची अडवणूक केली नसून, नातेवाईकांनी केलेले दावे खोटे आहेत. उलट रुग्णाला उत्तमोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती जहांगीर हाॅस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली.