“सौ चुहे खाके, बिल्ली हजको चली’

  • अकरा वर्षांत पदवीधरांसाठी चंद्रकांत पाटलांनी काय दिवे लावले
  • राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा सवाल

पिंपरी – पुणे पदवीधर मतदारसंघाचे तब्बल 11 वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्‍न सोडविला नाही. चंद्रकांत पाटलांमुळेच पुणे मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान झाले. राज्यात भाजपाचे सरकार असतानाही पदवीधरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटलांना आता निवडणुकीमध्ये पदवीधरांची आठवण झाली आहे. खोट बोलण्यात माहीर असलेल्या चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडी सरकारवरील टीका म्हणजे “सौ चुहे खाके बिल्ली हजको चली’ असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार केला. या दरम्यान पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. राज्य सरकारचा उल्लेख करंटा असा करतानाच महाविकास आघाडीमुळे पदवीधरांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या टीकेला संजोग वाघेरे यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेताना वाघेरे म्हणाले, सहा वर्षांच्या दोन टर्ममध्ये चंद्रकांत पाटील यांना पदवीधरांनी संधी दिली. मात्र त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्‍न सोडविला नाही. अकरा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काय दिवे लावले ते त्यांनी अगोदर जाहीर करावे.

चंद्रकांत पाटील हे राज्यात भाजपाचे सरकार असताना याच पदवीधरांच्या आशिर्वादामुळे पाच वर्षे मंत्री होते. मात्र मंत्रीपदाच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काहीही न करणाऱ्या पाटलांना निवडणुकीमध्ये मते घेण्यासाठी आता पदवीधरांचे प्रश्‍न आठवू लागले आहेत. 11 वर्षांच्या काळातील अपयश लपविण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करत असून त्यांच्या टिकेला आता कोणीही गांभिर्याने घेत नाही. 1 डिसेंबर रोजी पदवीधर आपला रोष मतपेटीतून व्यक्त करतील आणि चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखवून देतील, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरात जनतेसाठी घेतलेल्या निर्णयामुळे पदवीधर महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याने अरुण लाड यांचा विजय निश्‍चित होईल, असा विश्‍वासही वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.