पुणे – पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने दर वाढणाऱ्या पेट्रोलने पुण्यात पहिल्यांदाच शंभरी पार केली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्य नागरिकांमधून मात्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
पुण्यात सोमवारी (दि.31) साधे पेट्रोल 100.15 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. पॉवर पेट्रोलच्या दराने यापूर्वी शंभरी पार केली आहे. पॉवर पेट्रोलला लिटरसाठी 103.83 रुपये, तर डिझेलसाठी प्रति 90.71 रुपये मोजावे लागत आहेत. सीएनजीचे (55.50 रुपये) दर स्थिर आहेत, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली.
पुण्यात गेल्या आठवड्यापासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर 99.87 रुपये इतके होते. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग असल्याचे दिसून येत आहे. 4 मे रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 96.95 रुपये प्रतिलिटर होता. आतापर्यंत यामध्ये 3.52 रुपयांची वाढ झाली आहे.
काही दिवस इंधनाचे दर स्थिरसुद्धा झाले होते. पुन्हा दरवाढ सुरू झाल्याने, आज मुंबईकरांना 100.47 रुपये लिटर दराने पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे.राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणीत आहेत. रविवारी (दि. 30) पेट्रोल 102.57 रुपये तर, डिझेल प्रतिलिटर 93 रुपये चार पैसे प्रतिलिटरने विकले जात होते. पॉवर पेट्रोलचा दर 105 रुपये 22 पैसे होता.
डिझेल दराचाही उच्चांक
मालवाहतूकदारांकडून डिझेलचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका मालवाहतूकदारांना बसला आहे. करोना काळात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि मालाची वाहतूक सेवा सुरू असताना, डिझेल दरवाढीमुळे दुहेरी संकटाचा सामना वाहतूकदारांना करावा लागत आहे.