स्थायी समितीसमोर प्रस्ताव ः “वायसीएम’, भोसरी रुग्णालयासाठी खरेदी
पिंपरी – महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयासह नवीन भोसरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी व्हेंटीलेटर आयसीयू, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरींज पंप, पोर्टेबल प्लस ऑक्सिमीटर आदी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सव्वापाच कोटी रूपये खर्च होणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात सध्या कार्यान्वित असलेल्या अतिदक्षता विभागासह नवीन अतिदक्षता विभाग आणि सीएमओ विभागात आवश्यक असलेली उपकरणे खरेदी करण्यात येणार होती. त्यासाठी 5 कोटी 77 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 31 मे 2018 रोजीच्या पत्राद्वारे नवीन भोसरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठीही उपकरणे खरेदीची यादी सादर केली. वायसीएम रूग्णालयाच्या उपकरणे खरेदी निविदेमध्ये या खरेदीचाही समावेश करून एकत्रित खरेदी करावी, असे कळविले. मध्यवर्ती औषध भांडार विभागाने वायसीएम रुग्णालयासह नवीन भोसरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असलेल्या उपकरणे खरेदीचे 8 कोटी 55 लाख 41 हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेप्रमाणे ही निविदा रद्द करून निविदा तपशीलात बदल करण्यात आला. त्यानंतर 10 जानेवारी 2019 रोजी पुन्हा 8 कोटी 55 लाख रूपये खर्चाची ई-निविदा मागविण्यात आली. त्यानुसार, 40 नग मल्टीपॅरा मॉनिटर खरेदीसाठी युक्का डायग्नोस्टिक्स यांनी प्रति मॉनिटरसाठी 2 लाख 80 हजार रूपये लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, 40 नगांसाठी 1 कोटी 12 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. सिरींज पंपचे 68 नग खरेदीसाठी श्री कन्स्ट्रक्शन यांनी प्रति नग 1 लाख 78 हजार रूपये दर सादर केला. त्यानुसार, 68 नग खरेदीसाठी 1 कोटी 21 लाख रूपये खर्च होणार आहेत.
पोर्टेबल प्लस ऑक्सिमीटरचे 35 नग खरेदीसाठी पी. शेषाद्री ऍण्ड कंपनी यांनी प्रति नग 1 लाख 78 हजार रूपये दर सादर केला. त्यानुसार, 35 नग खरेदीसाठी 26 लाख 87 हजार रूपये खर्च होणार आहेत. व्हेंटीलेटर आयसीयूचे 17 नग खरेदीसाठी युक्का डायग्नोस्टिक्स यांनी प्रति नग 15 लाख 50 हजारांचे दर सादर केला. त्यानुसार, 17 नग खरेदीसाठी 2 कोटी 63 लाख रूपये खर्च होणार आहेत. त्यानुसार वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी एकूण 5 कोटी 21 लाख 37 हजार रूपये खर्च होणार आहेत. हा विषय आगामी स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.