सराफा व्यवसायाला शंभर कोटींचा फटका

गुढीपाडव्याही मुहूर्त चुकत असल्याने व्यावसायिकांची नाराजी

पिंपरी – लॉकडाऊमुळे गेल्या आठवडाभरापासून शहरातील सराफ बाजार ठप्प पडला आहे. त्याशिवाय, दरवर्षी गुढीपाडव्याला होणारी सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर एक ठराविक वेळ ठरवून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. एकीकडे ठराविक दुकाने, उद्योगांना परवानगी दिली जात आहे. तर, दुसरीकडे सराफ व्यावसायिक, कापड विक्रेते यांना परवानगी नाकारली जात आहे. हा दुजाभाव कशासाठी? असा प्रश्‍न सराफ व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. शहरामध्ये सराफ व्यावसायिकांची 400 दुकाने आहेत. त्यांची दररोजची उलाढाल ही कोट्यवधी रुपयांची आहे.

मंगळवारी (दि. 13) गुढीपाडवा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा या सणाकडे पाहिले जाते.  मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नेमक्‍या पाडव्याच्या दिवशी सराफ बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त चुकणार आहे. सध्या लगीनसराई सुरू आहे. त्यासाठी देखील सोने-चांदीच्या विविध दागिन्यांची खरेदी होत असते. 

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या चिंतेत भरच पडली आहे. सराफ बाजार बंद असल्याने कारागीरांना दागिन्यांवरील कारागिरीसाठी मिळणारी मजुरी मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. पर्यायाने त्यांच्यासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

सराफा व्यवसाय बंद करून सरकारला काहीच फायदा मिळणार नाही. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि सध्या सुरू असलेली लगीनसराई सराफ व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे आहे. सराफ बाजार सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना कराव्या. प्रसंगी त्यासाठी कंपन्यांची मदत घ्यावी. आवश्‍यक निधी गोळा करून कोविड सेंटर, बेड उपलब्धता, व्हेंटीलेटर आदींची सोय वाढवावी.
– विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर सराफ ऍण्ड ज्वेलर्स.


शहरातील सुमारे 400 दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी 100 कोटी रुपयांची उलाढाल त्यामुळे ठप्प पडणार आहे. अन्य दुकाने सुरू करण्यास परवानगी देताना सराफ व्यावसायिक आणि कापड विक्रेते यांनाच का परवानगी नाकारली जात आहे ? करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून दुकानांसाठी एक ठराविक वेळ ठरविण्यात यावी. मात्र, दुकाने खुली करण्यास परवानगी द्यायला हवी.
– दिलीप सोनिगरा, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशन.


सध्या सराफ बाजार बंद असल्याने सराफ व्यावसायिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. सर्वांना सरसकट लॉकडाऊन करावा. काही दुकाने खुली, काही दुकाने बंद असा भेदभाव करू नये.
– राहुल चोपडा, सत्यम ज्वेलर्सचे राहुल चोपडा


सराफ बाजार बंद असल्याने बॅंकांचे हप्ते, कामगारांचे पगार, विविध कर, वीजबिल व्यापाऱ्यांनी कसे भरायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण करण्याऐवजी व्यापाऱ्यांचा विचार करायला हवा.
– प्रकाश मेहता, भरत ज्वेलर्स

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.