पिंपरी – किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत तसेच आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, या मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. ही घटना बुधवारी (दि. २०) दुपारी चिंचवड स्टेशन येथील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगरमध्ये घडली.
आनंदनगरमध्ये ३० हून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर महापालिकेच्यावतीने सील करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने या भागातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
दुकाने बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत शेकडो नागरिक बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास रस्त्यावर उतरले. आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. यावेळी काही जणांनी हुल्लडबाजी ही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इतर नागरिकांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
येथील सर्व नागरिकांना महापालिकेच्यावतीने जेवण देण्यात येईल. तसेच किराणा माल व राशनची दुकानेही सुरू ठेवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर हा जमाव पांगला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वतः आनंदनगरमध्ये दाखल झाले आहेत त्यांची परिसरातील नागरिकांसोबत चर्चा सुरू आहे.
आनंदनगर परिसरात दोन हजार ३०० घरे असून १०हजार नागरिक राहतात. मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा जमाव रस्त्यावर उतरल्याने करोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. यापैकी अनेकांनी तोंडावर मास्कही बांधलेले नव्हते.