मागील काही दिवसांपूर्वी रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीत दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले न उचलता वेळकाढूपणा केला आहे. संबंधित विभागाला तक्रार केल्यानंतर त्यांनी दखल घेतली नाही.
परंतु महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना सांगितल्याबरोबर निगडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाणी तपासणीसाठी नमुने नेले. त्यामध्ये साधारण तीन दिवस गेले. गुरुवारी (दि. 2) सोसायटीला पाण्याचे रिपोर्ट देण्यात आले.
पाइपलाइन लीकेज झाल्याने दूषित पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अपाय झाला आहे. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक आजारी पडून देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांची कोणतीही विचारपूस अथवा उपाययोजना करण्यात आली नाही.
तसेच सोसायटीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही वेगळी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नारिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी रोष असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सध्या सोसायटीतील नागरिक पाणी उकळून घेत आहेत. परंतु ते पाणी देखील कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे उकळलेले पाणी नागरिकांसाठी पिण्या योग्य आहे की नाही हे महापालिका प्रशासनाने तपासणी करून पहावे. तसेच जोपर्यंत स्वच्छ आणि चांगला पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत सोसायटीसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
पिंपरी – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. रावेतमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पाचशेहून अधिक नागरिक दूषित पाण्यामुळे आजारी पडले असल्याचा दावा सोसायटीच्या अध्यक्षांनी केला. तसेच याबाबतचा पालिकेचा अहवाल देखील आला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना पाणीपुरवठा करणारी वाहिनी लीकेज झाल्याने तुंबलेले ड्रेनेजचे पाणी नागरिकांना पोहचले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दूषित पाणीपुरवठ्याने सोसायटीतील जवळपास पाचशेहून अधिक रहिवासी आजारी पडले आहेत. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने मदत करायला हवी होती. परंतु महापालिका प्रशासनाने याबाबतीत कोणत्याही प्रकारे विचारपूस केलेली नाही. किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. आमच्या सोसायटीत सातशे फ्लॅटमध्ये तीन हजारांच्यावर नागरिक राहतात. महापालिका आयुक्तांना सांगितले तरी त्यावर कृती शून्य झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी नियमाचे घोडे नाचवून महापालिका अधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
– प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष, सेलेस्टियल सिटी फेज 1 फेडरेशन.